औरंगाबा: अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तरी अद्यापही थेट द्वितीय अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. नियोजनही शून्य दिसत आहे. दुसरीकडे मात्र विद्यार्थी प्रवेश सुरू झाले की नाही? हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालय, तंत्रशिक्षण विभागात चकरा माराव्या लागत आहे.
पॉलिटेक्नीक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येतात. दरवर्षी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू होताच थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन केले जाते. परंतु यावर्षी प्रवेशप्रक्रियेबाबत अद्यापही नियोजन केलेले नाही. विद्यार्थी मात्र तंत्रशिक्षण विभाग, महाविद्यालय कागदपत्रे घेऊन प्रवेशासाठी चकरा मारत आहे. त्यात त्यांचा वेळही वाया जात आहे. याशिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थीही शहरातील महाविद्यालयामध्ये थेट द्वितीय अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशाची विचारणा करण्यासाठी चकरा मारत आहे. त्यात त्यांचा पैसा वाया जात आहे. लवकरात लवकर प्रवेशप्रक्रियेचे नियोजन करावे, अशी मागणीही विद्यार्थ्यांकडून होत आहे. मागील वर्षी पॉलिटेक्नीक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर थेट द्वितीय अभियांत्रिकी अभ्यासक्रमात 20 टक्के जागा भरण्यात येत होत्या;परंतु यावर्षी दहा टक्क्यांनी जागा कमी केल्या आहेत. त्यामुळे प्रवेश मिळेल की नाही, याचीही चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे.








